शनिवार, ३० जून, २०१२

शिक्षकांचा योग्य सल्ला


सोलापूरच्या दयानंद महाविद्यालामधून विज्ञान शाखेतून बी.एस.सी परीक्षा प्रथम श्रेणीतून पास झालो आणि पुढील उच्चशिक्षण काय आणि कोणत्या विद्यापीठामधून करायचे असे सर्व प्रश्नांनी मनाला वेढले होते. त्यावेळी स्वतंत्र सोलापूर विद्यापीठ अस्तित्वात नसल्यामुळे फक्त कोल्हापूर व पुणे हि दोनच विद्यापीठे योग्य पर्याय आहेत अशी मनाची समज होती. त्यादुष्ट्रीने प्रयत्न केला पण पुरेशे गुण नसल्याने पदरी निराशा पडली. उच्च शिक्षणास मुकणार किंवा एखादे वर्ष तरी वाया जाणार अशा भीतीने ग्रासले होते. अशावेळी वर्गाबाहेर पालक म्हणून वागणाऱ्या दयानंद्च्या अनेक शिक्षकापैकी एका शिक्षकाकडे सल्ला मागण्यासाठी गेलो आणि मला हायसे वाटले. सर्व विद्यापीठामध्ये मिळणाऱ्या पदवीचे महत्व हे एकसारखेच असते. यामध्ये चांगले वाईट असा भेदभाव नसतो हे मला त्यांनी पटवून दिले व मिळेल त्या विद्यापीठामध्ये आवडत्या विषयामध्ये पद्वुत्तर शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. 

शिक्षक या भूमिकेसोबत समाजातील अनेक सामाजिक कार्यामध्ये सहभाग असणारे व प्रत्यक्ष कृती करणारे हे प्राध्यापक मोहन मद्वान्ना यांच्या या सल्ल्याविषयी विश्वास वाटला. या विश्वासाला माझे वडीलबंधू प्रा. संजय करंडे यांनी साथ दिली आणि मी एम.एस.सी (रसायनशास्त्र) हि पदवी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधून प्रथम श्रेणीने पूर्ण केली. पुढे याच शिक्षणाच्या जोरावर मला पुण्याच्या नामांकित राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये जेष्ठ शाश्त्रज्ञ डॉ. प्रकाश वडगावकर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. याच संधीच्या जोरावर आज माझे उच्च शिक्षण इटलीमधील रोम विद्यापीठामध्ये युरोपीय स्कॉलरशिप मिळवून यशस्वीपणे सुरु आहे.  

 अशापद्धतीने आयुष्यामध्ये शिक्षकांनी दिलेला योग्य सल्ला मला महत्वाचा वाटतो व माझी सामाजिक जाणीव वाढवितो. अशा या योग्य शिक्षकांचे मी व माझे कुटुंब आयुष्यभर ऋणी आहोत.

३० जून २०१३ रोजी "सकाळ"  वर्तमानपत्र