शास्त्रज्ञ रिटा लेवी यांचा जन्म २२ एप्रिल १९०९ साली तुरीन या इटलीमधील छोट्या गावात सर्वसाधारण कुटुंबामध्ये झाला. त्यांना एक जुळी बहिण होती. जी पुढे प्रसिद्ध चित्रकार झाली. मात्र स्वतःचे करिअर घडविताना खूप त्रास सहन करावा लागल्याचे ते सांगतात. आपले शिक्षण झाल्यावर पूर्ण वेळ डॉक्टर म्हणून काम करण्याचे आधी ठरविले होते. मात्र कुटुंबाचा एक मित्र कॅन्सर या रोगाला बळी पडल्याने संशोधनाकडे वळल्याचे सांगतात. त्यांच्या संशोधनास लागणारी प्रयोगशाळा विसाव्या शतकात सहज
उपलब्ध होत नसल्याने त्यांनी आपल्या बेडरूम मध्ये पहिली प्रयोगशाळा उघडली
हे विशेष. तरुण वयामध्ये त्यांनी आपल्याच गावामध्ये शिक्षकाची नोकरी स्वीकारली आणि उरलेल्या वेळेत स्वतःच्या घरामध्ये उभारलेल्या प्रयोगशाळेमध्ये काम करणे सुरु केले. याच काळात
युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धाचे वारे वाहत होते. सर्व नागरिकांना दुसऱ्या देशात स्थलांतर होणे किंवा भूमिगत होण्याशिवाय पर्याय नव्हता. रिटा लेविच्या कुटुंबाने भूमिगत होण्याचा निर्णय घेतला होता. असा खडतर संघर्ष सहा वर्षे सुरु होता. काहीकाळ युद्धामधील जखमी लोकांना मेडिकल सेवा पुरविण्याचे काम त्यांनी केले तर बराचसा वेळ वाचन करण्यामध्ये घालविला. १९४५ मध्ये दुसरे महायुद्ध संपल्यानंतर आपल्या गावी नाझी सैनिकांनी उध्वस्त केलेली प्रयोगशाळा पुन्हा सुरु केली व संशोधन सुरु ठेवले. ज्या अमेरिकन शास्त्रज्ञाचे संशोधन साहित्य वाचून काम सुरु होते त्याच शात्राज्ञाकडून शिष्यवृत्तीमिळाल्याचे कळाले व लगेचच अमेरिकेमधील सेंट लुइस येथे संशोधन सुरु के
अमेरिकेमध्ये गेल्यानंतर बऱ्याच वर्षापूर्वी केलेले प्रयोग पुन्हा पडताळून पहिले. या प्रयोगांमुळे पूर्ण जीवन बदलून गेल्याचे ते सांगतात. एक वर्षासाठी मिळालेली शिष्यवृत्ती पुढे वाढत गेली आणि कायम स्वरूपी प्रोफेसर म्हणून तेथेच काम करण्याची संधीही मिळाली ती अगदी रिटायर होईपर्यंत. संशोधनामध्ये काही सिद्धांत तपासण्यासाठी त्यांनी आपला देश सोडून अमेरिकेमध्ये जरूर पलायन केले पण आपल्या मूळ देशाशी कधी नाते तोडले नाही. त्यांच्या मते अमेरिकेत राहून जरी यशस्वी संशोधन केले असले तरी त्यासाठी लागणारे मूळ संशोधनाची पायाभरणी मी इटली देशामध्येच केल्याचे सांगतात. अमेरिकेतील संशोधना सोबतच त्यांनी रोम मधील काही संशोधन संस्थांमध्ये काम सुरु ठेवले व आपल्या देशामधील लोकांची संशोधन वृत्ती वाढेल याची काळजी घेतली. रिटायर होताच पुन्हा आपल्या देशामध्ये १९७९ मध्ये नव्या जोमाने संशोधन करण्यास सुरुवात केली. निवृत्ती नंतरदेखील पूर्ण वेळ काम करून जवळपास १८ वर्षानंतर १९८६ साली त्यांना नोबेल पारितोषिक मिळाल्याचे जाहीर झाले. मला वाटते वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर थकलो म्हणनार्यांना हि चपराक असेल तर रिटायर झाल्यानंतर आमचे आता काय राहिले असे समजणाऱ्या आपल्या वडीलधार्यांना हि गोष्ट
लाजविल्याशिवाय राहणार नाही. मागील काही वर्षांपूर्वी आपल्या पुणे विद्यापीठाने देखील अशीच रिटायर लोकांना संशोधन करण्याची संधी दिली होती पुढे याचे काय झाले मला माहित नाही पण हा एक योग्य निर्णय असावा असे म्हणण्याचे धाडस एक संशोधन करणारा विद्यार्थी म्हणून करावे वाटते.
नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर इटली सरकारने त्यांच्या कामाची दखल घेऊन सर्व आर्थिक रसद पुरवून नवनवीन संस्थांची निर्मिती करून दिली. अशी अनेक वर्षे संस्था प्रमुख म्हणून काम केल्याने सरकारच्या मदतीने स्वतःच्या विषया संदर्भात मेंदूवर संशोधन करणारी संस्था उभी केली. त्यांच्या अशा कामाचा तडाखा पाहून इटली अध्यक्षांनी सरकारमध्ये सामील करून घेतले तर त्यांचा शंभरावा वाढदिवसही धुमधडाक्यात साजरा केला होता. तसेच डेथ बाय डिझाईन The Life and Times of Life
and Times या नावाची त्यांच्या कामावर आधारित एक जगप्रसिद्ध
डॉक्यूमेंटरी १९९५ साली प्रदर्शित झाली आहे.
अशा या अमृतरूपी महिलेने नुकताच इटली मधील रोम
येथे या जगाचा निरोप घेतला तो ३० डिसेंबर २०१२ या दिवशी. म्हणजे तब्बल १०३ वर्षे जगणारी महिला नोबेल विजेतीचा मानही त्यांनी मिळविला. 'कर्तबगार व्यक्तींना आयुष्य कमी असते' किंवा 'चांगलीच माणसे देवालाही आवडतात' अशा चुकीच्या वाक्यांना खोटे ठरविण्यासाठीच जणू या भले मोठे आयुष्य जगल्या कि काय अशी शंका मला येते. आपल्या आयुष्यात शंभर वाढदिवस साजरे करणारे अनेकजण आपण पाहिले किंवा ऐकले असतील पण वयाच्या १०३ वर्षापर्यंत सतत काम करून संशोधन वृत्ती कायम ठेवणारी ही एकमेव महिला होय.
रोम शहरामध्ये अंत्यसंस्कार झाल्यावर सरकारने श्रद्धांजली वाहण्याचा वेगळाच प्रकार मला पहावयास मिळाला. जगामधील सात आधुनिक आश्चर्यांमधील एक आश्चर्य 'कलोसियम' हे रोम शहरामध्ये आहे. या ऐतिहासिक वास्तुच्या सभोवताली नवीन वर्षाचे स्वागत फटाके वाजवून केले जाते. तर अशा नववर्षदिनी या जगप्रसिद्ध वास्तूवर महिला शास्त्रज्ञाचा बहुमान म्हणून इटली सरकारने तिचा
जीवनपट सर्व लोकांना स्लाईड शोच्या माध्यमातून दाखविला
व ज्ञानरुपी श्रद्धांजली वाहिली. त्याची काही छायाचित्रे उपलब्ध करण्याचे भाग्य मला मिळाले आहे.
आपल्याकडेही नवीन वर्ष सुरु होताना प्रत्येक व्यक्ती काहीतरी
संकल्प करतो. तर पाहूयात कि आपणही प्रगत देशांप्रमाणे काही कर्तुत्ववान व्यक्तींचे
स्मरण करतो का ते. कर्तुत्ववान व्यक्ती मरताना श्री. दि. इनामदार यांच्या कवितेप्रमाणे
असेच आवाहन करत असेल,
"मेल्यावर तुझे ठायी पुन्हा एकदा रुजू दे,