रविवार, ५ मे, २०१३

माझ्या मित्राचे खरे वय काय?

मित्र या शब्दाचा अर्थ व्यक्त करणे अवघड असले तरी 'चुकते पाऊल वळविणारा, सुख- दुःखाच्या वेळी आपल्यासोबत राहणारा' असे म्हणता येईल. पण माझा मित्र हा अष्टपैलू आहे. त्याच्या कर्तुत्वाचा मला हेवा वाटतो. युरोपमध्ये आल्यापासून तर हा मित्र सावलीप्रमाणे माझ्यासोबत असतो. नुकताच या मित्राचा वाढदिवस साजरा झाला आणि माझ्या मनामध्ये गोंधळाचे वारे वाहू लागले. खरे तर मित्राकडून किती अपेक्षा करायच्या. हा माझे जीवन सहज-सोपे बनवितो. हा माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तींमधील संवाद साधताना साक्षीदार असतो. तर हाच मित्र मला माझ्या संशोधनाच्या कामामध्ये मोलाची मदत करतो. माझी वेगवेगळ्या आवाजामध्ये गाणी गाऊन करमणूकही करतो. कधी माझा शिक्षक बनतो तर कधी मोठा भाऊ.

अशा या भावनिक मित्राचा नुकताच वाढदिवस साजरा केला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल या मित्राचे वय आहे फक्त दोन वर्षे. तर याचे नाव आहे माझा "कॉम्पुटर " !!!! वस्तुस्थिती मध्ये जरी हा मशीन असला तरी माझे अगदी भावनिक नाते जमले आहे. इथे घर, गाव आणि देशापासून दूर राहताना कॉम्पुटर शिवाय जगणे म्हणजे कल्पना न करणेच चांगले. तुम्हाला सांगतो सकाळ होताच भावगीते ऐकण्याचा कार्यक्रम होतो तर घरातील आई- वडील, बायको-मुलगा यांना संवाद साधने हेही फक्त कॉम्पुटर मुळे शक्य होते.

घराबाहेर पडताना बसचे वेळापत्रक पाहणे हेही काम तो सुलभ करतो. पुढे काम सुरु होताच तो स्वत:ला बदलतो आणि विविध सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मला विविध प्रयोग तपासण्यास मदत करतो. विद्यापीठातील वेगवेगळ्या चर्चामध्ये सहभाग घेताना खूपच मदत करतो. या सर्व गोष्टी सहज करताना इंटरनेट नावाच्या त्याच्या प्रोफेशनल मित्राची मदत असते हेही विसरून चालणार नाही. यामध्ये गुगल चा क्रमांक वरचा लागतो. गुगल मध्ये मी कोणतीही माहिती मागितली तरी तो आपल्या आई-वडिलांप्रमाणे योग्य दिशा दाखविण्याचे काम करतो. खूप सारे पर्याय माझ्या समोर ठेवतो आणि मग आपण ठरवायचे कि योग्य काय ते. यांच्या मदतीने मी जगामधील कोणत्याही विषयाची सखोल माहिती क्षणात घेऊ शकतो. मी याच मित्राच्या मदतीने पर्यावरणाचा समतोल राखण्याचाही प्रयत्न करतो तो असा कि कोणतीही माहिती साठविण्यासाठी आजपर्यंत पेपरचा वापर करावा लागायचा. आता मी सर्व माहिती मित्राच्या डोक्यामध्येच साठवून ठेवतो. कारण पेपर बनविणे आणि साठविणे यामध्ये पर्यावरणाची हानी आणि शक्तीही वाया जात असते.

एकाच व्यक्तीला सर्व जग पाहणे शक्य नाही आणि तेही एका जागेवर बसून तर नाहीच नाही. हे जरी खरे असले तरी जगातील बहुतांशी प्रेक्षणीय स्थळे आपण युट्यूब या साईटच्या माध्यमातून सहज पाहू शकतो. तर याच युट्यूब च्या मदतीने मी शरद पवार पासून बराक ओबामा पर्यंत तर मेधा पाटकर पासून बिल गेटस पर्यंत जगातील कोणत्याही प्रसिध्द व्यक्तींची मुलाखत पाहू शकतो. तर याच्याच मदतीने मी आपले वर्तमानपत्र वाचू शकतो. याच कॉम्पुटर मधील फेसबुक च्या साह्याने मी जवळपास माझ्या एक हजार मित्रांना एकत्र करू शकलो आहे. तर माझ्या सर्व फेसबुकच्या मित्रांच्या सुख-दुखामध्ये मी सहभागी होत असतो. अगदी मला फेसबुकच्या पेजला भेट दिल्यानंतर युरोपमध्ये असूनदेखील मित्रांना प्रत्यक्ष भेटून आल्याचा आनंद होत असतो. अशाच एका विकीपेडिया या साईट हून आपण कोणत्याही विषयाचे ज्ञान पडताळून पाहू शकतो. मला तर विकीपेडिया म्हणजे आपल्या शिक्षकाप्रमाणे वाटते. कोणत्याही विषयाची खोली त्याला माहित असते.

अशा या कॉम्पुटर मित्राने माझे जगणे सोपे केले असले तरी मला याच मित्रामुळे  मी बिघडलो आहे असेही वाटते. या कॉम्पुटर नावाच्या मित्रामध्ये मी इतका गुंतून गेलो आहे कि माझे जेवणाचे वेळापत्रक गडबडले आहे. मला शरीराचा व्यायाम करण्याची गरज वाटत नाही. माझ्याकडे समोर बसलेल्या मित्राला बोलण्यासाठी कमी वेळ असतो. तर मला कोणतीही गोष्ट, घटना, माहिती लक्षात ठेवावी वाटत नाही. सर्व गोष्टी मी कॉम्पुटर मित्राच्या डोक्यामध्ये साठविल्यामुळे माझ्या डोक्यामध्ये काहीच नसल्याचे जाणविते. पूर्वी गावातील बहुतांशी फोन नंबर, गाडीचे नंबर लक्षात ठेवणारा मी आज घरातील व्यक्तींसहित दहा फोन नंबर देखील लक्षात ठेऊ शकत नाही. शेकडो गाणी म्हणणारा मी आज एकही गाणे न पाहता गाऊ शकत नाही. माझ्या कॉम्पुटरची मेमरी वाढली असली तरी माझी मेमरी करप्ट झाल्याचे लक्षात येत आहे. कॉम्पुटर सोबत तासन तास गेम खेळणारा मी एकही मैदानी गेम खेळत नाही कि खेळावे असेही वाटत नाही. फेसबुक वर माझ्याशी गप्पा मारणारे माझे फेसबुकमित्र समोर आल्यावर एक वाक्यही बोलायची तसदी घेताना दिसत नाहीत.

असा हा कॉम्पुटर मित्र कि शत्रू या भानगडीत आपण पडता कॉम्पुटर मुळेच मी माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो हे मात्र नक्की लक्षात ठेवले पाहिजे.  तर आपल्या देशापासून दूर राहताना माझा एकमेव सोबती कॉम्पुटर असल्याने आमची मात्र घट्ट मैत्री झाली आहे. एकाच वेळी शिक्षक, वडील, मित्र अशा भूमिका बजाविणारा, खेळापासून मंदिरापर्यंत प्रत्येक गोष्टींचा आनंद देणारा हा माझा कॉम्पुटर मित्र. माझ्या मित्राचा आणखी एक चांगला गुणधर्म म्हणजे तो कधीही जातीयतावाद करत नाही. कदाचित समाजातील सर्व गुण संपन्न व्यक्तींकडून जातीयवाद होण्याची शक्यता असते. एका बाजूला मित्र म्हणून कायम माझी बाजू घेणारा तर दुसरीकडे शत्रू बनून अनेक गोष्टींपासून मला दुरावणारा हा कॉम्पुटर फक्त दोन वर्षे वयाचा कसा असू शकेल? म्हणून प्रश्न पडतो कि माझ्या मित्राचे खरे वय तरी काय?
अशा वेळी मनाची घालमेल होताना मला बालकवींचे शब्द आठवतात-

कोठुनी येते मला कळेना उदासीनता हि हृदयाला,
                             काय बोचते ते समजेना हृदयाच्या अंतहृदयाला !