शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१३

गोष्ट लाखाची !!!!!


आज मी तुम्हाला कोणतीही गोष्ट सांगणार नसून लाख या शब्दाची माहिती सांगणार आहे. आपल्याला एकावर पाच शुन्य म्हणजे एक लाख हे माहित आहे. शंभर लाखांचा एक कोटी हेही माहित आहेच की. लाख (लक्ष) हा शब्द इतका प्रचलित झाला आहे की, एखाद्या सुंदर मुलीला आपण विशेषण लावतो ' लाखात एक', एखाद्याने खूप महत्वाची माहिती सांगितली तरी म्हणतो 'लाखमोलाची माहिती' दिली आहेस. असो आपल्या या सवयीचा प्रभाव इतका खोलवर माझ्या मनात झाला की, मी युरोपमध्ये देखील लाखाचा शब्दप्रयोग करू लागलो. मागील आठवड्यामध्ये एका चर्चासत्रामध्ये मी गणिती नंबर २ लाख आहे म्हणून सांगत होतो. पण माझी शब्दरचना इटलीमधील लोकांना समजत नव्हती. मग मी नेहमीप्रमाणे लाख हा शब्द फळ्यावर लिहून दाखविला आणि आश्चर्य म्हणजे कोणालाही या शब्दाचा उलगडा झाला नाही. यावेळी आमचे हेडमास्तर विकीपेडिया यांनी सांगितले की, लाख हा शब्द फक्त भारत, पाकिस्तान आणि काही देशांपुरता मर्यादित आहे. असो माझा पोपट झाला हे खरे असले तरी आपल्याकडे काही शब्द इंग्रजी पेक्षाही जास्त आहेत हि लाखमोलाची गोष्ट मला समजली.