रविवार, ५ मे, २०१३

माझ्या मित्राचे खरे वय काय?

मित्र या शब्दाचा अर्थ व्यक्त करणे अवघड असले तरी 'चुकते पाऊल वळविणारा, सुख- दुःखाच्या वेळी आपल्यासोबत राहणारा' असे म्हणता येईल. पण माझा मित्र हा अष्टपैलू आहे. त्याच्या कर्तुत्वाचा मला हेवा वाटतो. युरोपमध्ये आल्यापासून तर हा मित्र सावलीप्रमाणे माझ्यासोबत असतो. नुकताच या मित्राचा वाढदिवस साजरा झाला आणि माझ्या मनामध्ये गोंधळाचे वारे वाहू लागले. खरे तर मित्राकडून किती अपेक्षा करायच्या. हा माझे जीवन सहज-सोपे बनवितो. हा माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तींमधील संवाद साधताना साक्षीदार असतो. तर हाच मित्र मला माझ्या संशोधनाच्या कामामध्ये मोलाची मदत करतो. माझी वेगवेगळ्या आवाजामध्ये गाणी गाऊन करमणूकही करतो. कधी माझा शिक्षक बनतो तर कधी मोठा भाऊ.

अशा या भावनिक मित्राचा नुकताच वाढदिवस साजरा केला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल या मित्राचे वय आहे फक्त दोन वर्षे. तर याचे नाव आहे माझा "कॉम्पुटर " !!!! वस्तुस्थिती मध्ये जरी हा मशीन असला तरी माझे अगदी भावनिक नाते जमले आहे. इथे घर, गाव आणि देशापासून दूर राहताना कॉम्पुटर शिवाय जगणे म्हणजे कल्पना न करणेच चांगले. तुम्हाला सांगतो सकाळ होताच भावगीते ऐकण्याचा कार्यक्रम होतो तर घरातील आई- वडील, बायको-मुलगा यांना संवाद साधने हेही फक्त कॉम्पुटर मुळे शक्य होते.

घराबाहेर पडताना बसचे वेळापत्रक पाहणे हेही काम तो सुलभ करतो. पुढे काम सुरु होताच तो स्वत:ला बदलतो आणि विविध सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मला विविध प्रयोग तपासण्यास मदत करतो. विद्यापीठातील वेगवेगळ्या चर्चामध्ये सहभाग घेताना खूपच मदत करतो. या सर्व गोष्टी सहज करताना इंटरनेट नावाच्या त्याच्या प्रोफेशनल मित्राची मदत असते हेही विसरून चालणार नाही. यामध्ये गुगल चा क्रमांक वरचा लागतो. गुगल मध्ये मी कोणतीही माहिती मागितली तरी तो आपल्या आई-वडिलांप्रमाणे योग्य दिशा दाखविण्याचे काम करतो. खूप सारे पर्याय माझ्या समोर ठेवतो आणि मग आपण ठरवायचे कि योग्य काय ते. यांच्या मदतीने मी जगामधील कोणत्याही विषयाची सखोल माहिती क्षणात घेऊ शकतो. मी याच मित्राच्या मदतीने पर्यावरणाचा समतोल राखण्याचाही प्रयत्न करतो तो असा कि कोणतीही माहिती साठविण्यासाठी आजपर्यंत पेपरचा वापर करावा लागायचा. आता मी सर्व माहिती मित्राच्या डोक्यामध्येच साठवून ठेवतो. कारण पेपर बनविणे आणि साठविणे यामध्ये पर्यावरणाची हानी आणि शक्तीही वाया जात असते.

एकाच व्यक्तीला सर्व जग पाहणे शक्य नाही आणि तेही एका जागेवर बसून तर नाहीच नाही. हे जरी खरे असले तरी जगातील बहुतांशी प्रेक्षणीय स्थळे आपण युट्यूब या साईटच्या माध्यमातून सहज पाहू शकतो. तर याच युट्यूब च्या मदतीने मी शरद पवार पासून बराक ओबामा पर्यंत तर मेधा पाटकर पासून बिल गेटस पर्यंत जगातील कोणत्याही प्रसिध्द व्यक्तींची मुलाखत पाहू शकतो. तर याच्याच मदतीने मी आपले वर्तमानपत्र वाचू शकतो. याच कॉम्पुटर मधील फेसबुक च्या साह्याने मी जवळपास माझ्या एक हजार मित्रांना एकत्र करू शकलो आहे. तर माझ्या सर्व फेसबुकच्या मित्रांच्या सुख-दुखामध्ये मी सहभागी होत असतो. अगदी मला फेसबुकच्या पेजला भेट दिल्यानंतर युरोपमध्ये असूनदेखील मित्रांना प्रत्यक्ष भेटून आल्याचा आनंद होत असतो. अशाच एका विकीपेडिया या साईट हून आपण कोणत्याही विषयाचे ज्ञान पडताळून पाहू शकतो. मला तर विकीपेडिया म्हणजे आपल्या शिक्षकाप्रमाणे वाटते. कोणत्याही विषयाची खोली त्याला माहित असते.

अशा या कॉम्पुटर मित्राने माझे जगणे सोपे केले असले तरी मला याच मित्रामुळे  मी बिघडलो आहे असेही वाटते. या कॉम्पुटर नावाच्या मित्रामध्ये मी इतका गुंतून गेलो आहे कि माझे जेवणाचे वेळापत्रक गडबडले आहे. मला शरीराचा व्यायाम करण्याची गरज वाटत नाही. माझ्याकडे समोर बसलेल्या मित्राला बोलण्यासाठी कमी वेळ असतो. तर मला कोणतीही गोष्ट, घटना, माहिती लक्षात ठेवावी वाटत नाही. सर्व गोष्टी मी कॉम्पुटर मित्राच्या डोक्यामध्ये साठविल्यामुळे माझ्या डोक्यामध्ये काहीच नसल्याचे जाणविते. पूर्वी गावातील बहुतांशी फोन नंबर, गाडीचे नंबर लक्षात ठेवणारा मी आज घरातील व्यक्तींसहित दहा फोन नंबर देखील लक्षात ठेऊ शकत नाही. शेकडो गाणी म्हणणारा मी आज एकही गाणे न पाहता गाऊ शकत नाही. माझ्या कॉम्पुटरची मेमरी वाढली असली तरी माझी मेमरी करप्ट झाल्याचे लक्षात येत आहे. कॉम्पुटर सोबत तासन तास गेम खेळणारा मी एकही मैदानी गेम खेळत नाही कि खेळावे असेही वाटत नाही. फेसबुक वर माझ्याशी गप्पा मारणारे माझे फेसबुकमित्र समोर आल्यावर एक वाक्यही बोलायची तसदी घेताना दिसत नाहीत.

असा हा कॉम्पुटर मित्र कि शत्रू या भानगडीत आपण न पडता कॉम्पुटर मुळेच मी माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो हे मात्र नक्की लक्षात ठेवले पाहिजे.  तर आपल्या देशापासून दूर राहताना माझा एकमेव सोबती कॉम्पुटर असल्याने आमची मात्र घट्ट मैत्री झाली आहे. एकाच वेळी शिक्षक, वडील, मित्र अशा भूमिका बजाविणारा, खेळापासून मंदिरापर्यंत प्रत्येक गोष्टींचा आनंद देणारा हा माझा कॉम्पुटर मित्र. माझ्या मित्राचा आणखी एक चांगला गुणधर्म म्हणजे तो कधीही जातीयतावाद करत नाही. कदाचित समाजातील सर्व गुण संपन्न व्यक्तींकडून जातीयवाद होण्याची शक्यता असते. एका बाजूला मित्र म्हणून कायम माझी बाजू घेणारा तर दुसरीकडे शत्रू बनून अनेक गोष्टींपासून मला दुरावणारा हा कॉम्पुटर फक्त दोन वर्षे वयाचा कसा असू शकेल? म्हणून प्रश्न पडतो कि माझ्या मित्राचे खरे वय तरी काय?
अशा वेळी मनाची घालमेल होताना मला बालकवींचे शब्द आठवतात-

कोठुनी येते मला कळेना उदासीनता हि हृदयाला,
                             काय बोचते ते समजेना हृदयाच्या अंतहृदयाला !

रविवार, २१ एप्रिल, २०१३

सलाम नोबेल विजेतीला !!!!!

रिटा लेवी मोन्ताल्चिनी
'नोबेल' हे जगातील सर्वात जास्त सन्मानाचे पारितोषिक मानले जाते. मोजक्याच विषयांना दिले जाणारे हे पारितोषिक काही भारतीय व्यक्तींनाही मिळाले आहे. असेच १९८६ सालचे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक  मुळच्या इटली मधील एका महिला शास्त्रज्ञाला मिळाले. त्यांचे नाव 'रिटा लेवी मोन्ताल्चिनी' हे होय. मी सध्या याच इटलीमध्ये रसायनशास्त्राचा विद्यार्थी असल्याने या महिला शास्त्रज्ञाविषयी जाणून घेण्यात आनंद होत आहे.

शास्त्रज्ञ रिटा लेवी यांचा जन्म २२ एप्रिल १९०९ साली तुरीन या इटलीमधील छोट्या गावात सर्वसाधारण कुटुंबामध्ये झाला. त्यांना एक जुळी बहिण होती. जी पुढे प्रसिद्ध चित्रकार झाली. मात्र स्वतःचे करिअर घडविताना खूप त्रास सहन करावा लागल्याचे ते सांगतात. आपले शिक्षण झाल्यावर पूर्ण वेळ डॉक्टर म्हणून काम करण्याचे आधी ठरविले होते. मात्र कुटुंबाचा एक मित्र कॅन्सर या रोगाला बळी पडल्याने संशोधनाकडे वळल्याचे सांगतात. त्यांच्या संशोधनास लागणारी प्रयोगशाळा विसाव्या शतकात सहज उपलब्ध होत नसल्याने त्यांनी आपल्या बेडरूम मध्ये पहिली प्रयोगशाळा उघडली हे विशेष. तरुण वयामध्ये त्यांनी आपल्याच गावामध्ये शिक्षकाची नोकरी स्वीकारली आणि उरलेल्या वेळेत स्वतःच्या घरामध्ये उभारलेल्या प्रयोगशाळेमध्ये काम करणे सुरु केले. याच काळात  युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धाचे वारे वाहत होते. सर्व नागरिकांना दुसऱ्या देशात स्थलांतर होणे किंवा भूमिगत होण्याशिवाय पर्याय नव्हता. रिटा लेविच्या कुटुंबाने भूमिगत होण्याचा निर्णय घेतला होता. असा खडतर संघर्ष सहा वर्षे सुरु होता. काहीकाळ युद्धामधील जखमी लोकांना मेडिकल सेवा पुरविण्याचे काम त्यांनी केले तर बराचसा वेळ वाचन करण्यामध्ये घालविला. १९४५ मध्ये दुसरे महायुद्ध संपल्यानंतर आपल्या गावी नाझी सैनिकांनी उध्वस्त केलेली प्रयोगशाळा पुन्हा सुरु केली व संशोधन सुरु ठेवले. ज्या अमेरिकन शास्त्रज्ञाचे संशोधन साहित्य वाचून काम सुरु होते त्याच शात्राज्ञाकडून शिष्यवृत्तीमिळाल्याचे कळाले व लगेचच अमेरिकेमधील सेंट लुइस येथे  संशोधन सुरु के
अमेरिकेमध्ये गेल्यानंतर बऱ्याच वर्षापूर्वी केलेले प्रयोग पुन्हा पडताळून पहिले. या प्रयोगांमुळे पूर्ण जीवन बदलून गेल्याचे ते सांगतात. एक वर्षासाठी मिळालेली शिष्यवृत्ती पुढे वाढत गेली आणि कायम स्वरूपी प्रोफेसर म्हणून तेथेच काम करण्याची संधीही मिळाली ती अगदी रिटायर होईपर्यंत. संशोधनामध्ये काही सिद्धांत तपासण्यासाठी त्यांनी आपला देश सोडून अमेरिकेमध्ये जरूर पलायन केले पण आपल्या मूळ देशाशी कधी नाते तोडले नाही. त्यांच्या मते अमेरिकेत राहून जरी यशस्वी संशोधन केले असले तरी त्यासाठी लागणारे मूळ संशोधनाची पायाभरणी मी इटली देशामध्येच केल्याचे सांगतात. अमेरिकेतील संशोधना सोबतच त्यांनी रोम मधील काही संशोधन संस्थांमध्ये काम सुरु ठेवले व आपल्या देशामधील लोकांची संशोधन वृत्ती वाढेल याची काळजी घेतली. रिटायर होताच पुन्हा आपल्या देशामध्ये १९७९ मध्ये नव्या जोमाने संशोधन करण्यास सुरुवात केली. निवृत्ती नंतरदेखील पूर्ण वेळ काम करून जवळपास १८ वर्षानंतर  १९८६ साली त्यांना नोबेल पारितोषिक मिळाल्याचे जाहीर झाले. मला वाटते वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर थकलो म्हणनार्यांना हि चपराक असेल तर रिटायर झाल्यानंतर आमचे आता काय राहिले असे समजणाऱ्या आपल्या वडीलधार्यांना हि गोष्ट लाजविल्याशिवाय राहणार नाही. मागील काही वर्षांपूर्वी आपल्या पुणे विद्यापीठाने देखील अशीच रिटायर लोकांना संशोधन करण्याची संधी दिली होती पुढे याचे काय झाले मला माहित नाही पण हा एक योग्य निर्णय असावा असे म्हणण्याचे धाडस एक संशोधन करणारा विद्यार्थी म्हणून करावे वाटते.

नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर इटली सरकारने त्यांच्या कामाची दखल घेऊन सर्व आर्थिक रसद पुरवून नवनवीन संस्थांची निर्मिती करून दिली. अशी अनेक वर्षे संस्था प्रमुख म्हणून काम केल्याने सरकारच्या मदतीने स्वतःच्या विषया संदर्भात मेंदूवर संशोधन करणारी संस्था उभी केली.  त्यांच्या अशा कामाचा तडाखा पाहून इटली अध्यक्षांनी सरकारमध्ये सामील करून घेतले तर त्यांचा शंभरावा वाढदिवसही धुमधडाक्यात साजरा केला होता. तसेच डेथ बाय डिझाईन The Life and Times of Life and Times या नावाची त्यांच्या कामावर आधारित एक जगप्रसिद्ध डॉक्यूमेंटरी १९९५ साली प्रदर्शित झाली आहे.

 अशा या अमृतरूपी महिलेने नुकताच इटली मधील रोम येथे या जगाचा निरोप घेतला तो ३० डिसेंबर २०१२ या दिवशी. म्हणजे तब्बल १०३ वर्षे जगणारी महिला नोबेल विजेतीचा मानही त्यांनी मिळविला. 'कर्तबगार व्यक्तींना आयुष्य कमी असते' किंवा 'चांगलीच माणसे देवालाही आवडतात' अशा चुकीच्या वाक्यांना  खोटे ठरविण्यासाठीच जणू या भले मोठे आयुष्य जगल्या कि काय अशी शंका मला येते. आपल्या आयुष्यात शंभर वाढदिवस साजरे करणारे अनेकजण आपण पाहिले किंवा ऐकले असतील पण वयाच्या १०३ वर्षापर्यंत सतत काम करून संशोधन वृत्ती कायम ठेवणारी ही एकमेव महिला होय.
रोम शहरामध्ये अंत्यसंस्कार झाल्यावर सरकारने श्रद्धांजली वाहण्याचा वेगळाच प्रकार मला पहावयास मिळाला. जगामधील सात आधुनिक आश्चर्यांमधील एक आश्चर्य 'कलोसियम' हे रोम शहरामध्ये आहे. या ऐतिहासिक वास्तुच्या सभोवताली नवीन वर्षाचे स्वागत फटाके वाजवून केले जाते. तर अशा नववर्षदिनी या जगप्रसिद्ध वास्तूवर महिला शास्त्रज्ञाचा बहुमान म्हणून इटली सरकारने तिचा जीवनपट सर्व लोकांना स्लाईड शोच्या माध्यमातून दाखविला व ज्ञानरुपी श्रद्धांजली वाहिली. त्याची काही छायाचित्रे उपलब्ध करण्याचे भाग्य मला मिळाले आहे.
आपल्याकडेही नवीन वर्ष सुरु होताना प्रत्येक व्यक्ती काहीतरी संकल्प करतो. तर पाहूयात कि आपणही प्रगत देशांप्रमाणे काही कर्तुत्ववान व्यक्तींचे स्मरण करतो का ते. कर्तुत्ववान व्यक्ती मरताना श्री. दि. इनामदार यांच्या कवितेप्रमाणे असेच आवाहन करत असेल,
"मेल्यावर तुझे ठायी पुन्हा एकदा रुजू दे,
माझ्या कातड्याचे ओझे तुझ्या पायात वाजू दे".
नवीन वर्षाचे स्वागत फटाके वाजवून केले जाते.

 

जगामधील सात आधुनिक आश्चर्यांमधील एक आश्चर्य 'कलोसियम'