यश म्हणजे नक्की काय याचा उलगडा मला आणखी होत नाही. " तुला परीक्षेला किती मार्क मिळाले ?" एवढ्या साध्या प्रश्नाची मी अपेक्षा करायचो. मात्र माझ्या सभोवताली असणारया सर्व गावातील प्रतिष्ठीत, मित्र, पाहुणे विचारायचे कि " लागला वाटत रिझल्ट ? कितवा नंबर आला? ". असा प्रश्न ऐकल्यानंतर पूर्ण वर्ष कष्ट करून मिळविलेल्या मार्कांचा क्षणभरसुद्धा आनंद घेता यायचा नाही. अशावेळी मला माझ्या वडिलांचा आधार असायचा कारण माझे वडील शिक्षक. मुलांना मानसिक आधार कसा द्यायचा हे फक्त शिक्षकच समजू शकतात. मात्र मला कधी प्राथमिक शाळेनंतर पहिला नंबर मिळविता आला नाही हेही तितकेच खरे.
असो माझा जन्म अनगरचा. जन्मादरम्यान तत्कालीन मंत्री शरद पवार येथे आल्यामुळे माझ्या स्वातंत्र्यसेनानी आजोबांनी माझे नाव शरद ठेवले. माझे बालपण कोकणामध्ये गेले कारण त्यावेळी माझे पप्पा कोकणात शिक्षक होते. पुढे उरलेले प्राथमिक व हायस्कूलचे शिक्षण मी माझ्या गावी व अनगरला पूर्ण केले. या पूर्ण काळामध्ये सर्वात मोठा अधिकारी हा शेतकी साहेब असतो एवढेच मला माहित होते. शेतकी साहेब होण्यासाठी विद्यान शाखेची डिग्री घ्यावी लागते असेही कळाले. त्यावेळी आमच्या गावी सायन्स नसल्याने मी बाहेर जाण्याचे ठरविले. मात्र तत्कालीन मुख्याद्यापकांनी माझी पात्रता ओळखून दाखला देण्यास नकार दिला. पण अखेर त्यांचे मन वळविण्यास मी यशश्वी झालो आणि माझे बारावीचे शिक्षण मी सातारा जिल्ह्यातील फलटणहून पूर्ण केले.
बारावीमध्ये जेमतेम मार्क मिळाल्याने काम्पुटर कोर्स व त्याच्या जोडीला दयानंद मधून बीएससी करण्याचा निर्णय झाला. इथेच खऱ्या अर्थाने माझा आणि जगाचा संबंध आला. अनेक चांगले मित्र मिळाले यामध्ये सकाळ समूहाचा "युवा सकाळ" चाही समावेश होता. या पेपरमधून ह.अ. भावेंचे लेख वाचणे, कात्रणे काढणे याची सुरुवात झाली. याच काळामध्ये वक्तृत्व, कथाकथन, मैदानी खेळ, प्रश्न मंजुषा अशा स्पर्धांमधून सहभाग वाढला तर एनसीसी मध्ये प्रत्यक्ष भाग घेऊन शिस्त, आदर, नेतृत्व अशा गुणांना चालना मिळून आत्मविश्वास वाढला. या बळावरच मी माझे पदवुत्तर शिक्षणही औरंगाबाद मधून पूर्ण केले. या शिक्षणाच्या काळामध्ये अनेकदा अधून-मधून समाज सुधारण्याचे झटके यायचे पण वेळीच अनेक मित्र, शिक्षक यांच्या मार्गदर्शनाने सावध केले. त्याचे महत्व आज समजते.
माझे जीवन आता सुरु होत आहे आणि आपल्याला अजून खूप काही शिकायचे आहे असे वाटत असतानाच पाहुणे मंडळीची "आता पुरे झाले शिक्षण, काहीतरी जबाबदारी घ्यायला शिका" अशी किरकिर ऐकू येत होती. पण मला आई-वडिलांचा पाठींबा होता. याच्या जीवावर मी विषयांतर्गत स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुणे गाठले. पुढे संधी मिळताच मी पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये तात्पुरत्या कालावधीसाठी रुजू झालो. मला मोजकाच पगार मिळायचा पण हि बातमी गावाकडे इतक्या झोरात आणि इतका मसाला टाकून पोहोचली कि माझे दोनाचे चार हात करण्यास कोणीही रोखू शकले नाही. अखेर लग्नानंतर सर्व काही बदलते हे ऐकून मी तशी मनाची तयारी केली व माझी ग्रंथसंपदा गरजू मित्रांना वाटूनही टाकली. आता माझा आणि विषय वाचनाचा संबंध संपला असेही ठाम वाटत होते.
आणि खरच लग्नानंतर सगळे बदलले. स्वतः शेती विषयामधून उच्च पदवी घेतलेल्या माझ्या पत्नीने जग हे किती लहान आहे याची जाणीव मला करून दिली. घरातील सर्व जबाबदाऱ्या, नातेवाइकांच्या अपेक्षा या स्वतःच्या खांद्यावर घेऊन मला परदेशामध्ये शिक्षणाला जाण्यास उदुक्त केले. लहानपणी गावाच्या नावाच्या भेंड्या खेळताना देखील जगाच्या नकाशाला घाबरणारा मी आज इटलीमध्ये एका विद्यापीठामधून डॉक्टरेट पूर्ण करत आहे. माझी इंग्रजीची भीती घालविण्यासाठी तिने माझ्यासोबत पुण्यामध्ये खासगी क्लासही पूर्ण केला. इंग्रजी बोलणे हे पोहायला शिकण्यासारखे आहे त्यामध्ये पडलात कि आपोआप येते, थोडे हात पाय हलवावे लागतात हे नक्कीच.
म्हणून आज मला एका पुस्तकातील वाक्य आठवते " तुम्ही भारतातून बाहेर पडू शकता, पण भारत काही तुमच्या मनातून बाहेर पडू शकत नाही". ज्या समाज आणि कुटुंबामुळे मला आज मान मिळत आहे त्यांची सेवा पुढील काळामध्ये करण्याची इच्छा आहे. लहानपणी रात्री जोराची लागल्यावर मम्मीला सोबत घेऊन जाणारा मी आज अनेक देशामध्ये एकटा फिरत असतो याचे मलाही नवल वाटते.
रविवार, ६ मे, २०१२
यश माझे धाडस कुटुंब-समाजाचे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा