शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१२

माझी पहिली मुलाखत

२८ डिसेंबर २०१२, सकाळ कार्यालय, सोलापूर.

कॉलेज जीवनापर्यंत कधीही वर्तमानपत्राचा आणि माझा संबंध आला नाही. माझ्या गावामध्ये आजही रोजचे वर्तमानपत्र येत नाही हि वस्तुस्थिती आहे. यामुळे माझी मुलाखत कधी वर्तमानपत्रामध्ये येईल हे मला स्वप्नात देखील वाटले नव्हते. मात्र कुटुंबाच्या विश्वासाने आणि समाजाच्या साथीने मी माझे शिक्षण घेत आहे. शिक्षण पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला गाव, नंतर जिल्हा तर सध्या देश सोडल्यामुळे  माझ्या शिक्षणाबरोबर अनेक अनुभव मला मिळाले. या अनुभवाचा फायदा व आत्मविश्वास बाकी विद्यार्थ्यांना मिळावा म्हणून सकाळने केलेले हे प्रयत्न.
सकाळ ने घेतलेल्या या मुलाखतीमुळे मला तात्पुरती प्रसिद्धी मिळाली असली तरी, यामुळे माझ्यासारखे शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्याचा हा एक बहुमान आहे. अशा या उपक्रमामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. भविष्य काळामध्ये मी माझे शिक्षण प्रामाणिकपणे पूर्ण करीन व मला आलेले अनुभव जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे. 

सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१२

यशस्वी व्यक्तींनी करिअर मार्गदर्शन करावं



तारुण्य बहरत असताना बऱ्याचदा करिअर कशामध्ये करायचे हा प्रश्न दररोज पडायचा. अशावेळी सर्वात जवळचा वाटणारा मित्र रोजचा वर्तमानपत्र हा असायचा. हा मित्र प्रश्न सोडवायला मदत करता माझे कन्फ्युजन वाढवायचा. आज क्रिकेटची बातमी वाचली कि ठरायचे खेळ हेच आपले करिअर, कधी नवीन पिक्चरचे यश वाचले कि वाटायचे आपण अभिनेता बनायचे, कधी धाडशी अधिकाऱ्याची बातमी  वाचली कि मनाशी घट्ट ठरवायचो आपण अधिकारी बनायचे, एखादा नवीन शोध लागला कि वाटायचे आपण शास्त्रज्ञ बनायचे. असे दररोज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या विचाराचा विक्रम मी माझ्या कॉलेज जीवनामध्ये केला आहे.


फक्त वडील शिक्षक असल्यामुळे व दररोज अनेक शिक्षक भेटत असल्यामुळे शिक्षकाचे स्वप्न मी कधी पहिले नाही. मात्र कॉलेजमध्ये एखादे लेक्चर अभ्यासक्रमाशिवाय असल्यास मला खूप मजा यायची व त्या लेक्चर देणाऱ्या व्यक्ती कोण आहेत  हे जाणून घेण्याची उत्कंठा असायची. अशा आवडीमधून मी माझ्या दृष्टीकोनातून यशस्वी वाटणाऱ्या अनेक व्यक्तींना भेटलो. त्यामध्ये पोलीस ऑफिसर, राजकारणी, कवी, लेखक, नाटककार, उद्योजक, शेतकरी, शास्त्रज्ञ, इ.चा समावेश होता. या यशस्वी व्यक्तींना मी विचारतो कि आपण या क्षेत्रात करिअर करण्याचा विचार कसा केला ? या प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात जवळपास सर्वच लोकांनी आम्हाला त्यावेळी तसे गाईड करायला कोणी नव्हते अशीच केली. तर काही जणांनी नातेवाईक वगैरेची नावे सांगितली. अशी उत्तरे ऐकल्यानंतर मी हाच प्रश्न वेगवेगळ्या वयोगट मधील यशस्वी व्यक्तींना विचारला यामध्ये अनेक नवीन व जुन्या शिक्षकांचादेखील समावेश होता. तर प्रत्येकांनी आम्हाला त्यावेळी मार्गदर्शन करायला कोणी नव्हते असेच सांगितले. म्हणजे याचाच अर्थ पन्नास वर्षापूर्वी आणि पाच वर्षाआधी आम्हाला मार्गदर्शन करायला कोणी नव्हते अशी एकच स्थिती होती असाच काढायचा का?


तर मला सापडलेले याचे उत्तर असे आहे कि एखादा विद्यार्थी यशस्वी झाला कि तो स्वतः आपल्या पेशामध्ये इतका गुरफुटून जातो कि विचार करायला उसंतच नसते. आता पूर्ण ज्ञान असूनही पुन्हा आपल्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये अनुभव शेअर करायला चुकुनसुद्धा जात नाही. यामागची प्रत्येकाची कारणे वेगळी असू शकतात मात्र वस्तुस्थिती अशीच आहे. म्हणून मागील काही वर्षामध्ये माजी विद्यार्थी मेळावा, पालक मेळावा असे बरेच प्रकार राबविले जातात. परंतु अशा मेळाव्यासाठी कॉलेजला / शाळेला  प्रत्येक माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे अश्यक्य आहे.


तर आपल्या वेळी मार्गदर्शन करायला कोणी नव्हते व आता आपल्याला बऱ्याच गोष्टींचे ज्ञान आहे. त्या माहिती असणाऱ्या गोष्टी फक्त आपली मुलेबाळे व नातेवाईक इतके मर्यादित न ठेवता ते किमान आपल्या शाळेमध्ये / कॉलेजमध्ये पोहोचवावे असे मला वाटते. यासाठी कोणत्याही मान सन्मानाची अपेक्षा न करणेही तितकेच योग्य आहे. अशी करिअर संबंधी माहिती सध्याच्या विद्यार्थ्यांना वेळीच मिळाल्यास ते स्वतःचे करिअर स्वतः ठरवितील. यामुळे पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी न आवडणाऱ्या क्षेत्रात करिअर करणारे व निराश झालेले युवक विद्यार्थी आपणास दिसणार नाहीत हा विश्वास मला वाटतो.
हा लेख १५ ऑक्टोंबर २०१2 रोजी "सकाळ" या अग्रमान्य वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाला आहे.

शनिवार, ३० जून, २०१२

शिक्षकांचा योग्य सल्ला


सोलापूरच्या दयानंद महाविद्यालामधून विज्ञान शाखेतून बी.एस.सी परीक्षा प्रथम श्रेणीतून पास झालो आणि पुढील उच्चशिक्षण काय आणि कोणत्या विद्यापीठामधून करायचे असे सर्व प्रश्नांनी मनाला वेढले होते. त्यावेळी स्वतंत्र सोलापूर विद्यापीठ अस्तित्वात नसल्यामुळे फक्त कोल्हापूर व पुणे हि दोनच विद्यापीठे योग्य पर्याय आहेत अशी मनाची समज होती. त्यादुष्ट्रीने प्रयत्न केला पण पुरेशे गुण नसल्याने पदरी निराशा पडली. उच्च शिक्षणास मुकणार किंवा एखादे वर्ष तरी वाया जाणार अशा भीतीने ग्रासले होते. अशावेळी वर्गाबाहेर पालक म्हणून वागणाऱ्या दयानंद्च्या अनेक शिक्षकापैकी एका शिक्षकाकडे सल्ला मागण्यासाठी गेलो आणि मला हायसे वाटले. सर्व विद्यापीठामध्ये मिळणाऱ्या पदवीचे महत्व हे एकसारखेच असते. यामध्ये चांगले वाईट असा भेदभाव नसतो हे मला त्यांनी पटवून दिले व मिळेल त्या विद्यापीठामध्ये आवडत्या विषयामध्ये पद्वुत्तर शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. 

शिक्षक या भूमिकेसोबत समाजातील अनेक सामाजिक कार्यामध्ये सहभाग असणारे व प्रत्यक्ष कृती करणारे हे प्राध्यापक मोहन मद्वान्ना यांच्या या सल्ल्याविषयी विश्वास वाटला. या विश्वासाला माझे वडीलबंधू प्रा. संजय करंडे यांनी साथ दिली आणि मी एम.एस.सी (रसायनशास्त्र) हि पदवी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधून प्रथम श्रेणीने पूर्ण केली. पुढे याच शिक्षणाच्या जोरावर मला पुण्याच्या नामांकित राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये जेष्ठ शाश्त्रज्ञ डॉ. प्रकाश वडगावकर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. याच संधीच्या जोरावर आज माझे उच्च शिक्षण इटलीमधील रोम विद्यापीठामध्ये युरोपीय स्कॉलरशिप मिळवून यशस्वीपणे सुरु आहे.  

 अशापद्धतीने आयुष्यामध्ये शिक्षकांनी दिलेला योग्य सल्ला मला महत्वाचा वाटतो व माझी सामाजिक जाणीव वाढवितो. अशा या योग्य शिक्षकांचे मी व माझे कुटुंब आयुष्यभर ऋणी आहोत.

३० जून २०१३ रोजी "सकाळ"  वर्तमानपत्र

रविवार, ६ मे, २०१२

यश माझे धाडस कुटुंब-समाजाचे


 यश म्हणजे नक्की काय याचा उलगडा मला आणखी होत नाही. " तुला परीक्षेला किती मार्क मिळाले ?" एवढ्या साध्या प्रश्नाची मी अपेक्षा करायचो. मात्र माझ्या सभोवताली असणारया सर्व गावातील प्रतिष्ठीत, मित्र, पाहुणे विचारायचे कि " लागला वाटत रिझल्ट ? कितवा नंबर आला? ". असा प्रश्न ऐकल्यानंतर पूर्ण वर्ष कष्ट करून मिळविलेल्या मार्कांचा क्षणभरसुद्धा आनंद घेता यायचा नाही. अशावेळी मला माझ्या वडिलांचा आधार असायचा कारण माझे वडील शिक्षक. मुलांना मानसिक आधार कसा द्यायचा हे फक्त शिक्षकच समजू शकतात. मात्र मला कधी प्राथमिक शाळेनंतर पहिला नंबर मिळविता आला नाही हेही तितकेच खरे.

असो माझा जन्म अनगरचा. जन्मादरम्यान तत्कालीन मंत्री शरद पवार येथे आल्यामुळे माझ्या स्वातंत्र्यसेनानी आजोबांनी माझे नाव शरद ठेवले. माझे बालपण कोकणामध्ये गेले कारण त्यावेळी माझे पप्पा कोकणात शिक्षक होते. पुढे उरलेले प्राथमिक हायस्कूलचे शिक्षण मी माझ्या गावी अनगरला पूर्ण केले. या पूर्ण काळामध्ये सर्वात मोठा अधिकारी हा शेतकी साहेब असतो एवढेच मला माहित होते. शेतकी साहेब होण्यासाठी विद्यान शाखेची डिग्री घ्यावी लागते असेही कळाले. त्यावेळी आमच्या गावी सायन्स नसल्याने मी बाहेर जाण्याचे ठरविले. मात्र तत्कालीन मुख्याद्यापकांनी माझी पात्रता ओळखून दाखला देण्यास नकार दिला. पण अखेर त्यांचे मन वळविण्यास मी यशश्वी झालो आणि माझे बारावीचे शिक्षण मी सातारा जिल्ह्यातील फलटणहून पूर्ण केले.

बारावीमध्ये जेमतेम मार्क मिळाल्याने काम्पुटर कोर्स त्याच्या जोडीला दयानंद मधून बीएससी करण्याचा निर्णय झाला. इथेच खऱ्या अर्थाने माझा आणि जगाचा संबंध आला. अनेक चांगले मित्र मिळाले यामध्ये सकाळ समूहाचा "युवा सकाळ" चाही समावेश होता. या पेपरमधून .. भावेंचे लेख वाचणे, कात्रणे काढणे याची सुरुवात झाली. याच काळामध्ये वक्तृत्व, कथाकथन, मैदानी खेळ, प्रश्न मंजुषा अशा स्पर्धांमधून सहभाग वाढला तर एनसीसी मध्ये प्रत्यक्ष भाग घेऊन शिस्त, आदर, नेतृत्व अशा गुणांना चालना मिळून आत्मविश्वास वाढला. या बळावरच मी माझे पदवुत्तर शिक्षणही औरंगाबाद मधून पूर्ण केले. या शिक्षणाच्या काळामध्ये अनेकदा अधून-मधून समाज सुधारण्याचे झटके यायचे पण वेळीच अनेक मित्र, शिक्षक यांच्या मार्गदर्शनाने सावध केले. त्याचे महत्व आज समजते.

माझे जीवन आता सुरु होत आहे आणि आपल्याला अजून खूप काही शिकायचे आहे असे वाटत असतानाच पाहुणे मंडळीची  "आता पुरे झाले शिक्षण, काहीतरी जबाबदारी घ्यायला शिका" अशी किरकिर ऐकू येत होती. पण मला आई-वडिलांचा पाठींबा  होता. याच्या जीवावर मी विषयांतर्गत स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुणे गाठले. पुढे संधी मिळताच मी पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये तात्पुरत्या कालावधीसाठी रुजू झालो. मला मोजकाच पगार मिळायचा पण हि बातमी गावाकडे इतक्या झोरात आणि इतका मसाला टाकून पोहोचली कि माझे दोनाचे चार हात करण्यास कोणीही रोखू शकले नाही. अखेर लग्नानंतर सर्व काही बदलते हे ऐकून मी तशी मनाची तयारी केली माझी ग्रंथसंपदा गरजू मित्रांना वाटूनही टाकली. आता माझा आणि विषय वाचनाचा संबंध संपला असेही ठाम वाटत होते.

आणि खरच लग्नानंतर सगळे बदलले. स्वतः शेती विषयामधून उच्च पदवी घेतलेल्या माझ्या पत्नीने जग हे किती लहान आहे याची जाणीव मला करून दिली. घरातील सर्व जबाबदाऱ्या, नातेवाइकांच्या अपेक्षा या स्वतःच्या खांद्यावर घेऊन मला परदेशामध्ये शिक्षणाला जाण्यास उदुक्त केले. लहानपणी गावाच्या नावाच्या भेंड्या खेळताना देखील जगाच्या नकाशाला घाबरणारा मी आज इटलीमध्ये एका विद्यापीठामधून डॉक्टरेट  पूर्ण करत आहे. माझी इंग्रजीची भीती घालविण्यासाठी तिने माझ्यासोबत पुण्यामध्ये खासगी क्लासही पूर्ण केला. इंग्रजी बोलणे हे पोहायला शिकण्यासारखे आहे त्यामध्ये पडलात कि आपोआप येते, थोडे हात पाय हलवावे लागतात हे नक्कीच.

म्हणून आज मला एका पुस्तकातील  वाक्य आठवते " तुम्ही भारतातून बाहेर पडू शकता, पण भारत काही तुमच्या मनातून बाहेर पडू शकत नाही". ज्या समाज आणि कुटुंबामुळे मला आज मान मिळत आहे त्यांची सेवा पुढील काळामध्ये करण्याची इच्छा आहे. लहानपणी रात्री जोराची लागल्यावर मम्मीला सोबत घेऊन जाणारा मी आज अनेक देशामध्ये एकटा फिरत असतो याचे मलाही नवल वाटते.