सोमवार, २८ जानेवारी, २०१३

इटलीमध्ये साजरा झाला प्रजासत्ताक दिन

राष्ट्रभक्ती म्हणजे नक्की काय याचा नेमका उलगडा होत नसला तरी विद्यार्थी दशेपासून लागलेली सवय काही अजून जात नाही हे मात्र लक्षात येते. कोणताही राष्ट्रीय दिवस म्हटले कि सकाळी लवकर उठणे, हातात तिरंगी झेंडा घेऊन गावामध्ये सर्व शाळेतील मित्रांसोबत घोषणा देत प्रभातफेरी काढणे. नियमाप्रमाणे ध्वजगीत, राष्ट्रगीत म्हणणे, कवायत करणे, एखाद्या थोर नेत्याविषयी पाठ केलेले भाषण म्हणून दाखविणे. वाटलेच तर एखादे देशभक्तीपर गीत म्हणणे याशिवाय राष्ट्रभक्ती म्हणजे नक्की काय हे आजपर्यंत समजले नाही.

असो आज मात्र परदेशामध्ये आल्यावर सर्वच देशी गोष्टींचे महत्व शंभर पटींनी वाढले आहे. भारतात आपल्या सभोवताली असणाऱ्या कितीतरी गोष्टी आज इथे असाव्या वाटतात. याचाच एक भाग म्हणजे आजचा ‘प्रजासत्ताक दिन’. मित्रांकडून माहिती मिळाली कि आजचा दिवस भारताच्या दूतावासामध्ये साजरा केला जातो आणि काय जणू मी या वेळेची वाटच पाहत बसलो होतो. सवयीप्रमाणे लवकर उठून भारतामधील बातम्या वाचल्या आणि राजपथावरील काही लाइव्ह दृश्ये पहिली. पुन्हा लहानपण जागे झाले आणि वेळेच्या आधी दोन तास रोम मधील भारताच्या दूतावासामध्ये पोहोचलो.

इथला प्रजासत्ताक दिन साजरा करण्याची पद्धत मात्र अगदीच वेगळी वाटली. झेंडावंदनाची वेळ होती ती दुपारी १२ वाजताची. कदाचित बाहेरच्या शहरामधून येणाऱ्या देशवासीयांची सोय व्हावी हा उद्देश असावा असे मला वाटते. दूतावासामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे जय हिंद म्हणून आवर्जून स्वागत करत होते. कोणत्याही सरकारी ऑफिसमध्ये अशा स्वागताची सवय नसल्याने मला All IS WELL या गांधीगिरीची आठवण झाली. सर्व वयाची, वेगवेगळ्या प्रांतामधील ४०-४५ माणसे एकत्रित झाल्यावर आम्हाला एका सजविलेल्या हॉलमध्ये जाण्यास सांगितले. इथे पोहोचल्यावर एक धक्का बसला तो म्हणजे झेंडा फडकविण्याचा कार्यक्रम हा एका सजविलेल्या, छोटेखानी हॉलमध्ये होणार होता. मी माझ्या आयुष्यामध्ये झेंडावंदन हे स्वच्छ अशा फक्त मैदानामध्येच पाहिलेला होता. कदाचित इथल्या दूतावासाला मैदानाची व्यवस्था नसावी अथवा तापमान खूपच कमी असल्यामुळे हॉलमध्ये कार्यक्रम असावा असा मी निष्कर्ष काढला.

एरव्ही इथे स्त्री-पुरुष असा भेदभाव न मानणारी भारतीय मंडळी आपल्या बायकांना चिकटून बसण्याऐवजी आपोआप आज स्त्री आणि पुरुषांचे दोन भाग होऊन वेगळे बसल्याचे मी पाहिले. इथे आलेला प्रत्येक व्यक्ती अनोळख्या व्यक्तींविषयी जाणून घेत होता. यामध्ये आम्ही विद्ध्यार्थी समवेत काही हॉटेल उद्योजक, भाषा शिकविणारे शिक्षक, तिकीट एजंट तर अनेक वर्षे सर्विस करून कायमस्वरूपी इथे राहण्याचा निर्णय केलेल्या लोकांचा समावेश होता. एखाद्या कार्पोरेट ऑफिसमध्ये चालणाऱ्या गाण्यासारखा लहान आवाजात देशभक्ती गीते ऐकू येत होती. तर दूतावासामध्ये काम करणारी मंडळी आपल्या घरचे लग्नकार्य असल्यासारखे पळापळ करताना दिसत होते. थोड्याच वेळामध्ये शांतता पसरली आणि राजदूतांचे हॉलमध्ये स्वागत झाले. कोणत्याही प्रकारचे सावधान/विश्राम न करता शांतपणे झेंडावंदन झाले आणि कोणतीही पंकट्रीस न घेता सर्वांनी राष्ट्रगीत अगदी एका सुरत म्हटल्याने मला समाधान वाटले.

ध्वजवंदन झाल्यावर आपल्या देशाचे राष्ट्रपती यांनी भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तींना दिलेला संदेश हिंदी आणि इंग्रजीमधून वाचून दाखविला. यानंतर स्वतः राजदूत व त्यांच्या टीमने प्रत्येक उपस्थित व्यक्तीची भेट अगदी कोणताही अविर्भाव न आणता घेतली तसेच आम्हाला जास्तच महत्व देऊन कोतूकही केले. नाहीतर झेंडा फडकविणाऱ्या व्यक्तीला याआधी कधी भेटल्याचे मला आठवत नाही. इथल्या प्रथेप्रमाणे जेवणाचा कार्यक्रम असल्याचेही समजले. जेवणाची फी द्यावी लागणार नाही याची खातरजमा केल्यानंतर भारतीय पंच-पक्व्वानांचा यथेच्छ आनंद घेतला व विद्यापीठामध्ये राष्ट्रीय सण परदेशामध्ये साजरा करून परतलो.