सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१२

यशस्वी व्यक्तींनी करिअर मार्गदर्शन करावं



तारुण्य बहरत असताना बऱ्याचदा करिअर कशामध्ये करायचे हा प्रश्न दररोज पडायचा. अशावेळी सर्वात जवळचा वाटणारा मित्र रोजचा वर्तमानपत्र हा असायचा. हा मित्र प्रश्न सोडवायला मदत करता माझे कन्फ्युजन वाढवायचा. आज क्रिकेटची बातमी वाचली कि ठरायचे खेळ हेच आपले करिअर, कधी नवीन पिक्चरचे यश वाचले कि वाटायचे आपण अभिनेता बनायचे, कधी धाडशी अधिकाऱ्याची बातमी  वाचली कि मनाशी घट्ट ठरवायचो आपण अधिकारी बनायचे, एखादा नवीन शोध लागला कि वाटायचे आपण शास्त्रज्ञ बनायचे. असे दररोज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या विचाराचा विक्रम मी माझ्या कॉलेज जीवनामध्ये केला आहे.


फक्त वडील शिक्षक असल्यामुळे व दररोज अनेक शिक्षक भेटत असल्यामुळे शिक्षकाचे स्वप्न मी कधी पहिले नाही. मात्र कॉलेजमध्ये एखादे लेक्चर अभ्यासक्रमाशिवाय असल्यास मला खूप मजा यायची व त्या लेक्चर देणाऱ्या व्यक्ती कोण आहेत  हे जाणून घेण्याची उत्कंठा असायची. अशा आवडीमधून मी माझ्या दृष्टीकोनातून यशस्वी वाटणाऱ्या अनेक व्यक्तींना भेटलो. त्यामध्ये पोलीस ऑफिसर, राजकारणी, कवी, लेखक, नाटककार, उद्योजक, शेतकरी, शास्त्रज्ञ, इ.चा समावेश होता. या यशस्वी व्यक्तींना मी विचारतो कि आपण या क्षेत्रात करिअर करण्याचा विचार कसा केला ? या प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात जवळपास सर्वच लोकांनी आम्हाला त्यावेळी तसे गाईड करायला कोणी नव्हते अशीच केली. तर काही जणांनी नातेवाईक वगैरेची नावे सांगितली. अशी उत्तरे ऐकल्यानंतर मी हाच प्रश्न वेगवेगळ्या वयोगट मधील यशस्वी व्यक्तींना विचारला यामध्ये अनेक नवीन व जुन्या शिक्षकांचादेखील समावेश होता. तर प्रत्येकांनी आम्हाला त्यावेळी मार्गदर्शन करायला कोणी नव्हते असेच सांगितले. म्हणजे याचाच अर्थ पन्नास वर्षापूर्वी आणि पाच वर्षाआधी आम्हाला मार्गदर्शन करायला कोणी नव्हते अशी एकच स्थिती होती असाच काढायचा का?


तर मला सापडलेले याचे उत्तर असे आहे कि एखादा विद्यार्थी यशस्वी झाला कि तो स्वतः आपल्या पेशामध्ये इतका गुरफुटून जातो कि विचार करायला उसंतच नसते. आता पूर्ण ज्ञान असूनही पुन्हा आपल्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये अनुभव शेअर करायला चुकुनसुद्धा जात नाही. यामागची प्रत्येकाची कारणे वेगळी असू शकतात मात्र वस्तुस्थिती अशीच आहे. म्हणून मागील काही वर्षामध्ये माजी विद्यार्थी मेळावा, पालक मेळावा असे बरेच प्रकार राबविले जातात. परंतु अशा मेळाव्यासाठी कॉलेजला / शाळेला  प्रत्येक माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे अश्यक्य आहे.


तर आपल्या वेळी मार्गदर्शन करायला कोणी नव्हते व आता आपल्याला बऱ्याच गोष्टींचे ज्ञान आहे. त्या माहिती असणाऱ्या गोष्टी फक्त आपली मुलेबाळे व नातेवाईक इतके मर्यादित न ठेवता ते किमान आपल्या शाळेमध्ये / कॉलेजमध्ये पोहोचवावे असे मला वाटते. यासाठी कोणत्याही मान सन्मानाची अपेक्षा न करणेही तितकेच योग्य आहे. अशी करिअर संबंधी माहिती सध्याच्या विद्यार्थ्यांना वेळीच मिळाल्यास ते स्वतःचे करिअर स्वतः ठरवितील. यामुळे पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी न आवडणाऱ्या क्षेत्रात करिअर करणारे व निराश झालेले युवक विद्यार्थी आपणास दिसणार नाहीत हा विश्वास मला वाटतो.
हा लेख १५ ऑक्टोंबर २०१2 रोजी "सकाळ" या अग्रमान्य वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा