गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१३

अनुभव पुनर्जन्माचा !!!!!

दहा वर्षापूर्वी सोलापूरमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो. लोकसभेच्या पोटनिवडणूकिमुळे कॉलेजला सुट्टी होती. नवरात्रीच्या काळामध्ये मोहोळ येथे हिंदू-मुस्लिम लोक एकत्र मिरवणूक काढतात याची माहिती मिळाली व पाहण्याचा मोह आवरला नाही. होस्टेलमधील पाच मित्रांसाहित कॅमेरा घेऊन निघालो. मोहोळ मार्गावर असणाऱ्या वडवळच्या नागोबाचे दर्शन घेतले. येथीलच प्रसिद्ध असणाऱ्या कृषिभूषण दादा बोडके यांचा मळा पहिला. उरलेले तीन किलोमीटरचे अंतर हे स्वतःहून थांबविलेल्या पाण्याच्या ट्रकमधून जाण्याचे ठरविले. ड्रायव्हर नवखा असल्याचे जाणविले. फक्त एक किलोमीटरचे अंतर पार केले आणि काय चक्क पाण्याने भरलेला आमचा ट्रक झाडावर जोराचा आदळला. सर्वांचे डोळे कधीचेच मिटलेले होते. काय झाले कळलेच नाही.

डोळे उघडून पाहतो तर काय. माझ्या उजव्या बाजूला ड्रायव्हर रक्ताने पूर्ण माखलेला आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत होता तर माझे पाचहि मित्र कावरेबावरे झाले होते. प्रत्येकाला बर्याच मोठमोठ्या जखमा झाल्या होत्या. भरभरून वाहणाऱ्या रस्त्याने अनेक लोक थांबले होते. एकानेही स्पर्श एकानेही स्पर्श करण्याचे धाडस केले नव्हते. एकही वाहन चालक विनवणी करून देखील दवाखान्यात घेऊन जाण्यास तयार नव्हता. अशा वेळी ताकदीचा वापर करून आम्ही दोघांनी एका जखमी मित्राला बळेच वाहनात ढकलले व सरकारी दवाखान्यात पोहोचते केले. खऱ्या अर्थाने सरकारी दवाखान्याचे महत्व त्या दिवशी समजले. पोलिस, राजकारणी अशा सर्व जणांची या दिवशी मदत झाली. या घटनेपासून अपघाताची भीती वाटायला लागली. जीवनाचे मुल्य काय आहे हे समजले. अडचणीच्या काळात दुसऱ्याला मदत करण्याची भावना बळावली. आम्ही काहीजण पुन्हा या देवाच्या दर्शनाला नियमितपणे जाऊ लागलो तर काहीजण देवाचे पुन्हा नावही घ्यायला तयार नाहीत. ड्रायव्हर गेल्याचे त्यावेळी दुखः वाटले नाही मात्र आज आपला पुनर्जन्म झाल्याचे नक्की वाटते आहे. असो आज आम्हा (दत्ता गणपाटील, अमोल जाधव, श्रीकांत काशीद, दत्ता चव्हाण, महेश माने) पाचही मित्रांना एकत्र दुसरा वाढदिवस साजरा करायला आनंद मिळत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा